युग (खगोलशास्त्र)
From Wikipedia, the free encyclopedia
खगोलशास्त्रामध्ये युग (इंग्रजी: Epoch - एपॉक) म्हणजे असा एक क्षण आहे ज्याला खगोलीय निर्देशांक, एखाद्या खगोलीय वस्तूचे घटक किंवा त्यांचे कक्षेतील स्थान यासारख्या काळानुसार बदलणाऱ्या खगोलीय गोष्टी अथवा परिमाणांसाठी संदर्भ बिंदू म्हणून वापरतात. विश्वामध्ये सर्व वस्तूंमध्ये सतत बदल होत असतात. उदाहरणार्थ, ताऱ्यांमधील अंतर बदलत असते, त्यांची तेजस्विता कमी-अधिक होत असते, ग्रहांचा अक्षीय कल बदलत असतो ज्यामुळे खगोलीय निर्देशांक बदलतात. त्यामुळे अशी वेळ किंवा क्षण ठरवणे गरजेचे असते जेव्हा परिमाणांची मापे अचूक होती. अश्या क्षणाचा संदर्भबिंदू म्हणून वापर करून खगोलीय वस्तूंचा भविष्यातील वेग आणि स्थान यांचे भाकीत करण्यासाठी त्यांच्या गतिशी निगडीत प्राचलांची गणना करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.
खगोलशास्त्रज्ञांचा समुदाय वेळोवेळी सर्वसहमतीने एखाद्या तारखेला नवीन खगोलीय युग घोषित करतो व त्याचा वापर करतो. काळानुसार विश्व बदलते आणि एक वेळ अशी येते की त्या खगोलीय युगासाठी वस्तूंची जी स्थिती होती ती वर्तमान काळापेक्षा खूप वेगळी होती. अश्या वेळी आपापसातील सहमतीने पुन्हा नवीन खगोलीय युग घोषित केले जाते आणि सर्व खगोलीय परिमाणे नवीन युगानुसार अद्ययावत केली जातात.